विद्यादान साहाय्यक मंडळातर्फे मनापासून धन्यवाद !!!

Friends 2निरंजन योग निसर्गोपचार संशोधन केंद्र आणि योग थेरपी सेंटर, औरंगाबाद याच्या ‌संचालिका योगतज्ञ डॉ चारुलता रोजेकर-देशमुख यांनी औरंगाबाद येथील डॉक्टर, वकील, उद्योजिका, पत्रकार, प्राध्यापक, कलाकार अशा विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सुविद्य महिलांचा ‘आम्ही मैत्रिणी’ हा ग्रुप स्थापन केला आहे. अतिशय सुजाण, उच्च विदयाविभूषित अशा या समविचारी महिलांद्वारे दीपावलीच्या निमित्ताने सामाजिक भान जपण्यासाठी एक अत्यंत स्तुत्य उपक्रम गेली पाच वर्षे राबविला जातो. सामाजिक क्षेत्रात मोलाचे कार्य करीत असणाऱ्या सामाजिक संस्थेला आर्थिक सहाय्य करून या मैत्रिणी हा दिपोत्सव साजरा करतात.

Friends 3यावर्षी हा सोहळा दिनांक ११नोव्हेंबर रोजी औरंगाबाद येथे झूम मिटिंगद्वारे मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यंदा हा मान मिळाला समाजातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना केवळ आर्थिक बाजू लंगडी असल्याने शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये यासाठी तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या विद्यादान सहाय्यक मंडळ यांना. खरेतर विद्यादान सहाय्यक मंडळ, ठाणे यांच्या औरंगाबाद शाखेचा औपचारिक प्रारंभ दि.२० सप्टेंबर २०२० रोजी झाला असला तरी त्यांचे काम येथे गेले वर्षभर सुरू आहे‌ आणि इतक्या लवकर या कामाची पोचपावती मिळणे ही निश्चितच आनंदाची गोष्ट आहे. अर्थातच या प्रसंगी बोलताना डॉ. स्मिता अवचार यांनी सांगितल्या प्रमाणे आर्थिक सहाय्य करण्यासाठी एखाद्या संस्थेची निवड‌ करताना‌ अतिशय पारदर्शकता राखली जाते. विद्यादान मंडळाचा गेल्या काही वर्षांतील कामकाजाचा लेखाजोखा अत्यंत बारकाईने पडताळल्यानंतरच त्यांची निवड सर्वानुमते करण्यात आली‌ आहे. विद्यादान मंडळाच्या गेल्या बारा वर्षांच्या अविरत कार्यास मिळालेली ही कौतुकाची पावती आहे. मदतीचा धनादेश डॉ स्मिता अवचार यांच्या हस्ते विद्यादान मंडळाच्या वतीने श्रीमती निलिमा संत यांनी स्वीकारला. तसेच श्रीमती संत आणि श्रीमती दाशरथे यांनी विद्यादान मंडळाच्या कार्याची ओळख उपस्थितांना करून दिली. यानंतर डॉ.चारुलता रोजेकर यांच्या भाषणाने या सुनियोजित अशा सुंदर समारंभाची सांगता झाली.